आम्ही कणकवलीकर व कोकण रेल्वे कामगार संघटनेतर्फे आयोजन
⚡कणकवली ता.१२-: कोकणवासीयांना स्वप्नवत वाटणाऱ्या कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करणारे प्रा. मधु दंडवते यांचा 17 वा स्मृतिदिन आहे. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकावर आम्ही कणकवलीकर ग्रुप आणि कोकण रेल्वेतील विविध कामगार संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मधु दंडवते यांच्या स्मृतीला वंदन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोकण रेल्वे बाबत त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय आणि अथक प्रयत्न याची माहिती उपस्थितांना करून देण्यात आली. मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेची उपलब्धता करून दिल्याबद्दल कोकणवासिय प्रवाशांनी त्यांच्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. दंडवते यांच्या स्मृति वंदना कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कोकण रेल्वेचे अभियंता पवन जोशी, कोकण रेल्वे संघटनेचे उमेश गाळवणकर, संजय खरीवले, प्रशांत तांबे, संतोष बापट, संगीता नकाशे, सचिन सरंगले, जे के दळवी, चंदन गुरव, व्ही. आर. सावंत, संतोष कदम, आम्ही कणकवलीकर ग्रुपचे दादा कुडतरकर, विजय गांवकर, प्रमोद लिमये, उमेश वाळके, नितीन पटेल, बाळा माणगावकर, महेश गुरव, संजय मालंडकर, संजय कदम, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक हरिभाऊ भिसे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या मधु दंडवते यांनी वर्ष 1977 मध्ये रेल्वेमंत्री म्हणून नियुक्त झाल्यावर जनता राजवटीमध्ये त्यांनी कोकण रेल्वेची उभारणी करण्याचा संकल्प सोडला. रेल्वेमंत्री झाल्यावर रेल्वेच्या कारभारात त्यांनी सुधारणा करण्याकडे लक्ष दिले. रेल्वेतील नोकरभरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार निपटण्यासाठी त्यांनी नोकरभरतीसाठी स्वतंत्र परीक्षा मंडळाची स्थापना केली. जनता पक्ष सत्तेवरून गेल्यावरही त्यांनी सतत कोकण रेल्वेच्या उभारणीच्या कामाचा पाठपुरावा केला. सत्तेवर नसले तरी सुरू झालेले कोकण रेल्वेचे काम मात्र धिम्या गतीने अनेक अडचणींचा सामना करीत तरीही चालूच राहिले आणि अखेर 1995 साली कोकणवासियांचे कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले याबद्दल कोकणवासीय प्रवासी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात .
