⚡मालवण ता.०५-: जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसोबत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले असून यात अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यापूर्वी या ऑनलाइन फसवणुकीत परप्रांतीय हिंदी भाषिक व्यक्तींचा समावेश असायचा, मात्र आता व्यापाऱ्यांना येणाऱ्या बनावट कॉल्समध्ये मराठी व मालवणी बोलणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याने आता ऑनलाइन गंडा घालणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रातील किंबहुना जिल्ह्यातील असण्याचा संशय सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाला असून याबाबत व्यापारी महासंघाने जिल्हा पोलीस अधिक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावधगिरी बाळगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल्सना बळी पडू नये, तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम सेलकडे व पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
मालवण येथील हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी नितीन वाळके बोलत होते. यावेळी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, मालवण शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, सचिव रवींद्र तळाशीकर, मंदार ओरसकर, सरदार ताजर आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन वाळके म्हणाले, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना लाईट बिल भरणे, कर्ज हप्ता भरणे, चांगली सेवा न देणे, फूड पॉइजनिंग अशा कारणांसाठी अज्ञात व्यक्तींकडून फोन येऊन व्यापाऱ्यांना बोलण्यात अडकवून रक्कम भरणा करण्यास सांगून आर्थिक फसवणूक होत आहे. फूड ऑफिसर बोलतोय, बँकेतून बोलतोय, वीज वितरण अधिकारी बोलतोय असे सांगून व्यापाऱ्यांना कारवाईच्या व नोटिसा पाठवण्याच्या धमक्या देऊन तसेच बोलण्यातून ब्लॅकमेल करून पैसे उकळले जात आहेत. आपल्या दैनंदिन व्यापात असणारा व्यापारी घाईगडबडीत समोरून विचारली गेलेली माहिती देऊन तसेच बोलण्याला बळी पडून पुढील कारवाई टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट द्वारे पैसे पाठवत असल्याने त्यांची फसवणूक होत आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी अशा प्रकारे व्यापाऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले असून मालवणातही ऑनलाइन फसवणूकीचे प्रयत्न झाले आहेत. बनावट कॉलवर बोलणाऱ्या, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या व्यक्ती या हिंदी भाषा बोलणाऱ्या म्हणजेच परप्रांतीय असतात, मात्र अलीकडे मराठी व मालवणी बोलणाऱ्या व्यक्तींकडूनही व्यापाऱ्यांना कॉल येत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यातील शैलीचा फरक लक्षात येतो, याबाबत व्यापारी महासंघाने जिल्हा पोलीस अधिक्षकांशी चर्चा करून लक्ष वेधले आहे, असेही नितीन वाळके म्हणाले.
व्यापाऱ्यांनी अशा बनावट कॉल्सना बळी पडू नये, व्यापाऱ्यांनी सावध राहावे. असे कॉल आल्यास समोरील व्यक्तीच्या धमक्यांना घाबरून जाऊ नये. त्यांना कोणताही प्रतिसाद देऊ नये तसेच कोणताही ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नये, आणि फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंद करावी. तसेच सायबर क्राईम सेलकडे व पोलिसांकडे रीतसर तक्रार करावी, ऑनलाइन फसवणुकीबाबत व्यापाऱ्यांच्या तक्रारी आल्यास त्या प्राधान्याने घ्याव्यात अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलीस स्थानकांना दिल्या आहेत, असेही वाळके म्हणाले.
