आपा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
⚡मालवण ता.०४-: मालवण नगरपरिषद हद्दीतील देऊळवाडा स्मशानभूमीचे नूतनीकरण करणे व शेड बांधकाम करणे तसेच वायरी अंबाजी शाळेजवळ मेस्त्री वाडी येथील परुळेकर घरापर्यंत आरसीसी गटार व काँक्रीट रस्ता बांधकाम करणे या दोन्ही कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा, अशी मागणी माजी नगरसेवक आपा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण देऊळवाडा येथील स्मशानभूमीची शेड गेली तीन वर्षे कोसळण्याच्या अवस्थेत असून केव्हाही पडून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करूनही निधी मिळालेला नाही. त्यामुळे हे होऊ शकलेले नाही. तसेच वायरी प्रभागातील पावसाळी पाण्यासाठी अंबाजी शाळेजवळ मेस्त्री वाडी येथील परुळेकर घरापर्यंत व्हाळी कम रोड करण्यासाठी मागील तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही या कामासाठी निधी मिळालेला नाही. हे काम न झाल्याने वायरी चव्हाणवाडी, लुडबेवाडीतील अनेक घरात पावसाळी पाणी घुसून मालमत्तेची हानी होते. या दोन्ही कामांना तांत्रिक मंजुरी मिळालेली असून या दोन्ही कामे होण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर करावा अशी मागणी आपा लुडबे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
