बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.०४-: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि दापोली येथील उपक्रमशील शिक्षक आणि मूळ मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे सुपुत्र श्री. बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेचा सन २०२२ या वर्षासाठीचा ‘ काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार ‘ नुकताच सोलापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्राप्तीबद्दल बाबू घाडीगांवकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

सोलापूर येथील इंडियन माॅडेल स्कूल च्या ए.डी. जोशी सभागृहात नुकताच काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेचा १२ वा राज्यस्तरीय काव्योत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या काव्योत्सवात राज्यभरातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. या समारोहात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व कोकणातील प्रथितयश साहित्यिक असलेल्या बाबू घाडीगांवकर यांचा काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख राजेंद्र दासरी यांचे हस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्यसचिव कालिदास चवडेकर, ज्येष्ठ कवी व गीतकार राष्ट्रपाल सावंत, काव्यगुरु विजय जोशी, विद्यालयाचे माजी प्राचार्य ए.डी. जोशी, संदीप वाघोले, जया नेरे, पत्रकार भरतकुमार मोरे, काव्यप्रेमीचे कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, सोलापूर शहराध्यक्ष महेश रायखेलकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष युवराज जगताप, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबू घाडीगांवकर यांचे साहित्य विविध दैनिके, नियतकालिके व दिवाळी अंकांमधून नियमित प्रसिद्ध होत असते. तसेच मालवणी भाषेतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचा ‘बाबा’ हा कवितासंग्रह तर ‘ वणवा ‘ हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

You cannot copy content of this page