⚡मालवण ता.०४-: मालवणच्या ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई यांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना, रात्रौ ९.३० वाजता पुराणवाचन सांगता, त्यानंतर मंदिर व मंदिराच्या कळसावर कोहाळ्याचे दिवे करुन श्री देवनारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी या पाचही मंदिरांवर दिप लावून दीपोत्सव साजरा होणार आहे. व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व मिरवणूक होणार असून श्री देव रामेश्वर एकरात्र श्री देव नारायण भेटीस थांबणार आहे. रात्री १२ वाजता गोरे दशावतारी मंडळाचे नाटक व पहाटे दहीहंडी व त्या नतंर प्रथेनुसार देव स्नान साठी पालखी कवटकर पुलाकडे जाऊन तेथे ब्राह्मणांच्या हस्ते स्नान पूजा होऊन त्यानंतर श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी श्री देव रामेश्वर मंदिरकडे मार्गस्थ होईल.
तसेच या कार्यक्रमाला प्रथेनुसार रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवाजी महाराजांचा राजदंड (चांदिचा) या उत्सवाला किल्ल्यावरील मानकरी वाजत गाजत घेऊन येणार असून ते उत्सव समाप्तीनंतर सकाळी मानाचे श्रीफळ (प्रसाद) घेऊन मार्गस्थ होतील. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
