मालवण (प्रतिनिधी)
मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथील टिकम शाळे नजीक राहणाऱ्या श्रीकृष्ण वसंत मणचेकर यांच्या घराला आज बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घरा मागील पडवीच्या ठिकाणी असलेल्या पाणी तापविण्याच्या चुलीतून ही आग लागून पडवीसह इतर साहित्य जळून नुकसान झाले. मणचेकर कुटुंबीय व स्थानिकांनी तात्काळ पाण्याचा मारा करत ही आग विझविली. त्यानंतर दाखल झालेल्या नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारेही पाण्याचा मारा करण्यात आला.
वायरी टिकम शाळे नजीकच्या घरात पत्नी व दोन मुलींसह राहणारे श्रीकृष्ण मणचेकर हे हातगाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी श्रीकृष्ण मणचेकर व त्यांची मोठी मुलगी कामानिमित्त बाहेर गेले होते. याच वेळी घराच्या मागील पडवीला लागून असलेल्या पाणी तापविण्याच्या चुलीतील आगीमुळे बाजूच्या शाकारलेल्या झावळानी पेट घेतल्याने ही आग लागली. झावळे व लाकूड सामानामुळे ही आग भडकून पडवीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
यावेळी मणचेकर यांची पत्नी व मुलीने आग लागल्याचे समजताच पाण्याचा मारा सुरू केला. याबाबत माहिती मिळताच श्रीकृष्ण मणचेकर व मोठी मुलगी यांनीही घराकडे धाव घेत आज विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीची माहिती माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मालवण नगरपालिकेला माहिती देऊन अग्निशमन बंबाला पाचारण केले. मात्र तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली. तर काही वेळाने दाखल झालेल्या अग्निदशमन बंबाद्वारेही पाण्याचा मारा करण्यात आला.
या आगीत लाकडे, हातगाडी, ड्रम, मासेमारी साहित्य व घराच्या छप्पराचा काही भाग जळून मोठे नुकसान झाले. यावेळी तलाठ्यांनी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच भाई ढोके, ऍड. मिलिंद सुकाळी यांसह इतरांनी पाहणी करत मणचेकर यांना धीर दिला.
