पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी बांदा भाजप कडून जय्यत तयारी…

सरपंच अक्रम खान आणि माजी सभापती शीतल राऊळ यांची माहिती

बांदा/प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे शनिवार दिनांक ५ रोजी जिल्ह्यात येणार असून त्यांच्या स्वागताची बांदा येथे शहर भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान, माजी सभापती शीतल राऊळ यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री चव्हाण यांनी स्वखर्चातून बांदा आणि माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राना ‘हेल्थ केअर किट’ उपलब्ध करून दिले आहे. शनिवारी दुपारी २.३० वाजता बांदा आरोग्य केंद्रात या किटचे लोकार्पण करण्यात येणार आहे. रेमिडी सोल्युशन किट असे या किटचे नाव असून त्याची किंमत ७ लाख रुपये आहे.
या किटच्या माध्यमातून सर्व तपासण्या मोफत होणार असून सुरुवातीला जिल्हा रुग्णालयाला जोडण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईतील नामांकित नानावटी रुग्णालयात जोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील थेट मुंबईतील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून उपचार करण्यासाठी मदत होणार आहे. या माध्यमातून डिजिटल ईसीजी, डिजिटल स्टेटस्कोप, पल्स ऑक्सिमिटर, ब्लड, शुगर, स्पायरोमिटर, हृदयाचे ठोके, आतड्याची क्षमता, तसेच इतर प्रयोगशाळा तपासण्या होणार आहेत. या हेल्थ किटचे लोकार्पण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते बांद्यातील जनतेच्या सेवेसाठी होणार आहे.
पालकमंत्री चव्हाण यांनी आतापर्यंत बांदा शहर व परिसरातील विकासकामांसाठी नेहमीच भरीव मदत दिल्याने तसेच पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बांद्यात येत असल्याने त्यांचे बांदा शहर भाजपच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. ज्यांना विकासकामांसदर्भात निवेदने द्यायची आहेत त्यांनी वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, तालुका सरचिटणीस दादू कविटकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरुनाथ सावंत, संदीप बांदेकर, संदेश महाले, डॉ. भालचंद्र कोकाटे, रत्नाकर आगलावे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page