सावंतवाडी खरेदी विक्री संघ निवडणूक
⚡सावंतवाडी ता.०१-: छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज बाद केल्याच्या विरोधात जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे उमेदवार गंगाराम शेळके यांनी केलेले अपील फेटाळत सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. या कामी वकील म्हणून परिमल नाईक यांनी काम पाहिले.
सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गंगाराम शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननी वेळी विरोधी उमेदवार दत्ताराम कोळमेकर यांनी या अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवार शेळके यांचे अंतिम मतदार यादीत नाव नाही. तसेच त्यांनी अर्ज दाखल करताना कोणत्या जागेसाठी निवडणूक लढवीत आहे, हे नमूद केलेले नाही, अशी हरकत घेतली होती. ही हरकत मान्य करीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शेळके यांचा अर्ज बाद ठरविला होता. त्या विरोधात शेळके यांनी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे अपील केले होते. यावेळी शेळके यांचे अपील फेटाळण्यात आले.
