मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा येथील कॉसमॉस या इमारतीत राहणारे आणि शिरशिंगे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दशरथ बापू सावंत (वय ५२) यांनी विषारी द्रव्य प्राशन करीत आपली जीवन यात्रा संपवली. सदर घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खासकीलवाडा येथील कॉसमॉस इमारतीत घडली. कीटकनाशक पिऊन दशरथ सावंत आपल्या फ्लॅटमधून इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्या ठिकाणी ते अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दशरथ सावंत हे शिरशिंगे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी काही कारणास्तव महिनाभर सुट्टी घेतली होती. आज ते एकटेच घरी होते. त्यांची पत्नी देखील शिक्षिका असून त्या शाळेत गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांनी हा प्रकार केला. दरम्यान त्यांच्याकडे सुसाईड नोट आढळली आहे. यात आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, किंवा कोणालाही त्रास देऊ नये, असे म्हटले आहे. तर आजारपणाला कंटाळून त्यांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे.
सदर घटनेची वार्ता शिक्षण क्षेत्रात पसरताच शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड हादरा बसला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
