⚡मालवण ता.०७-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगरपरिषदेने विविध कार्यक्रम आयोजित केले असून या अंतर्गत मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मालवण शहरात समूह राष्ट्रगानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मालवण नगरपरिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या उपक्रमासाठी मालवण नगर परिषदेकडून दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:५५ वाजता पहिला भोंगा वाजवून सर्वांना अलर्ट केले जाईल. त्यानंतर सकाळी १०:५९ मिनिटांनी दुसरा भोंगा वाजवला जाईल. हा दुसरा भोंगा संपल्यानंतर लगेच सर्व नागरिकांनी राष्ट्रगानाचे गायन सुरू करायचे आहे. समूह राष्ट्रगानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील शिक्षण संस्था बाजारपेठ व इतर मुख्य ठिकाणी नियोजित पद्धतीने राष्ट्रगान गायन करणार आहेत. तसेच शहरातील सर्व महिला बचत गट सोयीस्कर ठिकाणी एकत्र जमून समुह राष्ट्रगानात सहभागी होणार आहेत. इतर नागरिकांनीही ११ वाजता एकत्र येऊन अथवा जेथे असाल तेथे उभे राहून वरील राष्ट्रगानाचे गायन करावे आहे. सर्व नागरिकांनी एकाच वेळी राष्ट्रगानात सहभागी होऊन एकतेचे दर्शन घडवावे असे आवाहन मालवण नागरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
