हर घर तिरंगा जनजागृतीसाठी डाक विभागाची प्रभात फेरी

ओरोस ता.०६-:

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात “हर घर तिरंगा” अभियान राबविले जात आहे. या विशेष अभियानाच्या जनजागृतीसाठी भारतीय डाक विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी ५ ऑगस्ट रोजी डाक अधीक्षक कार्यालयातर्फे सिंधुदुर्गनगरी येथे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये डाक कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” अशा घोषणा देऊन या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या अभियानाबाबत जिल्ह्यातील लहान-थोर सर्वांना माहिती असावी या उद्देशाने डाक अधीक्षक कार्यालयामार्फत सिंधुदुर्गनगरी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद व डाक विभागामार्फत अधीक्षक डाक घर जी.जनार्दना रेड्डी, विकास अधिकारी बालाजी मुंडे, कार्यालयीन सहायक अशोक गावडे व श्रीम. श्वेता मुसळे यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात अधीक्षक डाकघर यांनी “हर घर तिरंगा” अभियानाबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व या अभियानानात विध्यार्थ्यानी सहभागी व्हावे तसेच पोस्ट विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या “ढाई आखर” स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या कार्यक्रमावेळी पोस्ट विभागातर्फे श्री. मुंडे व श्री. गावडे यांनी विध्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांना या दोन्ही अभियानाबाबत माहिती दिली.

You cannot copy content of this page