अन्यथा आंदोलन करण्याचा देव्या सूर्याजी यांचा इशारा
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील फ्रीजर बंद अवस्थेत आहे. बांधकाम व रुग्णालय प्रशासनानं तातडीने याबाबत योग्य ती भूमिका घेवून बंद असलेला फ्रीजर कायमस्वरूपी सुस्थितीत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत अन्यथा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा- संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील फ्रीजर बंद आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पर्यायी बांदा ग्रामीण रुग्णालयामध्ये सोय करावी लागते. दोन मृतदेहांची अशीच अवहेलना नुकतीच झाली आहे.
तर दुसरीकडे मृतदेह ठेवण्यासाठी अन्य खासगी व समाजसेवी संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली असून रुग्णालय प्रशासनाने मरणानंतर मृतदेहाची अवहेलना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
त्या मोडकळीस आलेल्या शवगृहाच्या इमारतीसह फ्रीजरचे काम करण्याच्या सुचना लवकरात लवकर बांधकाम विभागाला देण्यात याव्यात. याबाबत संबधित बांधकाम व रुग्णालय प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन कामास सुरुवात करावी अशी मागणी सुर्याजी यांनी केली आहे.
