मच्छीमारांनी अलर्ट राहत संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवावा

मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात आवाहन

⚡मालवण ता.०४-: भारतीय नौदलाच्या सामूदायिक संपर्क कार्यक्रमअंतर्गत सागरी सुरक्षेबाबत मच्छिमारांनी काळजी घेत समुद्रात कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास अलर्ट राहून सुरक्षा यंत्रणाना माहिती द्यावी, असे आवाहन नौदल, कोस्टगार्ड, पोलीस व मत्स्य अधिकाऱ्यांनी दांडी मालवण येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

नौदल, कोस्टगार्ड, मालवण पोलिस व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता, नौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणा, खराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजी, नौकांवर आवश्यक असणारी कागदपत्रे, समुद्रात संशयास्पद वस्तू अथवा कोणतीही हालचाल आढळल्यास द्यावयाची खबरदारी आदी विषयांबाबत भारतीय नौदलाच्या सामुदायिक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन दांडी येथे करण्यात आले होते.

यावेळी नौदलाचे लेफ्टनंट एम विनय कुमार, कोस्टगार्ड अधिकारी आर बी बनकर, राधेश्याम यादव, मानविर सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलीस कर्मचारी कैलास ढोले, दिलीप खोत, विश्वास पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनीही उपस्थिती दर्शवली. यावेळी नौका मालक, मत्स्य व्यावसायिक, ग्राम सागरी सुरक्षा दल सदस्य, वार्डन आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page