⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या संस्थेमध्ये इंटरनेट बँकिंग सेवेचा शुभारंभ नुकताच संस्थेच्या मुख्यकार्यालय फोंडाघाट येथे संस्थेचे चेअरमन दिलीप पारकर यांच्या हस्ते तसेच संचालक अरविंद रा. शिरसाट, महेश म. अंधारी, गणपत वि. वळंजू, श्री. गणपत शं. पारकर व मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
संस्थेचा ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वागिण विकासाकरिता सतत प्रयत्नशिल राहणे हे तत्व सभासद नजरेसमोर ठेवून आजतागायत आपली वाटचाल केली असून याच जोरावर संस्था जिल्हयात अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपास आली आहे. संस्थेचे कामकाज हे पूर्णतः संगणिकृत असून कोअर बँकिंग सिस्टीम मध्ये काम करत आहे. संस्थेने मोबाईल ॲप, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्युआर एसएमस अर्लट, मीनी एटीएम तसेच पासबुक प्रिंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पिमी संकलन हे पिम्मी मशिन बरोबरच मोबाईल व्दारे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात करून तत्पर व पारदर्शक सेवा देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
यावेळी बोलताना चेअरमन दिलीप पारकर यांनी संस्था करत असलेल्या प्रगतीचा आढावा घेवून भविष्यातील ध्येय धोरणांचा तपशिल सादर केला. आपली पतसंस्था असूनही संस्था ग्राहकांना देत असलेल्या सुविधा या बँकेच्या तोडीस असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी सांगून ग्राहकांचा वास मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. संस्था देत असलेल्या सेवा या जास्तीत जास्त सभासद तसेच ग्राहकांपर्यंत पोहचविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करूया तसेच या सर्व सेवांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक अरविंद शिरसाट यांनी केले.
