योगाची साधना करण्यास मिळणे ही गतजन्मीची पुण्याई – रमाताई जोग

मालवण येथे पतंजलीच्या योग शिबिराचा शुभारंभ

⚡मालवण ता.०३-: योगाचे महात्म्य हे केवळ ऐकून कळत नाही तर योग स्वतः प्रत्यक्ष केल्यावरच त्याची अनुभूती येते. योगामुळे शरीर कार्यरत होते आणि नियमित योगासने केल्याने शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात. योगाची साधना करण्यास मिळणे ही गतजन्मीची पुण्याई असते, असे प्रतिपादन महिला पतंजली योग समितीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सदस्या आणि ज्येष्ठ योग मार्गदर्शक रमाताई जोग यांनी येथे बोलताना केले.

दैवज्ञ ब्राह्मण हितवर्धक समाज, लायन्स क्लब, व्यापारी संघ, स्नेहल भगिनी मंडळ, मालवण आणि महिला पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथील दैवज्ञ भवन हॉल येथे पाच दिवसीय योग शिबीर आयोजित केले असून त्याचे उद्घाटन आज सायंकाळी दैवज्ञ ब्राह्मण हितवर्धक समाज मंडळाच्या अध्यक्ष सौ. स्वप्नाली नेरुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक रमाताई जोग, पतंजली योग समितीच्या मालवण तहसील प्रभारी सौ. वर्षाराणी अभ्यंकर, जिल्हा प्रभारी सौ. नर्मदा पटेल, लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, स्नेहल भगिनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. कल्पना सारंग, डॉ. गार्गी ओरसकर, लायन्सचे सदस्य गणेश प्रभुलीकर, सौ. जयश्री हडकर, उमेश शिरोडकर, अरविंद सराफ, पतंजलीच्या जिल्हा कोषाध्यक्ष सौ. तृप्ती तोरसकर, जिल्हा महामंत्री सौ. रश्मी आंगणे, जिल्हा संघटन मंत्री सौ. दिपश्री खाडीलकर, युवती प्रभारी सौ. श्वेता गावडे, सावंतवाडी तहसील प्रभारी ऍड. वर्षा गावकर, योग शिक्षिका सौ. प्रिया कोचरेकर, देवगड प्रभारी सौ. प्रणाली मराठे आदी उपस्थित होते.

यावेळी सौ. वर्षाराणी अभ्यंकर यांनी योग शिबिराबद्दल माहिती देत जास्तीत जास्त नागरिक व योग साधकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर गणेश प्रभुलीकर यांनी या योग शिबीर आयोजनाबद्दल आभार व्यक्त करत मालवण वासीयांचे आवश्यक ते सहकार्य लाभेल, असे सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर योग प्रशिक्षणाचे सत्र संपन्न झाले. यामध्ये मार्गदर्शक रमाताई जोग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी मालवण मधील नागरिक, महिला, योग साधक सहभागी झाले होते. या शिबिरात दि. ७ ऑगस्ट पर्यंत सकाळी ६ ते ८ आणि सायं. ५ ते ७ अशा दोन सत्रांमध्ये योग प्रशिक्षण होणार आहे.

You cannot copy content of this page