पाडलोसमधील शैक्षणिकदृष्ट्या जागृत पालकांचा सन्मान होणार

व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक ः विद्यार्थ्यांना केले गणवेश वाटप

⚡बांदा ता.१९-: शासनाच्या जीआरमध्ये बसत नसलेले विद्यार्थी गणवेश वाटपापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून प्राथमिक शाळांची पटसंख्या आम्ही टिकवत आहोत. पाडलोस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत तत्पर व जागृत असलेल्या पालकांची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करून प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही, पाडलोस विकास सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी दिली.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 मधील विद्यार्थ्यांना स्वखर्चाने गणवेश वाटप करताना श्री.नाईक बोलत होते. व्यासपीठावर तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुबल, श्रीधर परब, शिक्षक गोविंद शेर्लेकर उपस्थित होते.
प्रशासनाकडून गणवेश वाटपासंदर्भात होत असलेला दुजाभाव थांबणे गरजेचे आहे. मुळातच प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी असते आणि त्यात विद्यार्थ्यांची संख्या थोडी असते. पाडलोस गावातील जे पालक आपल्या पाल्याचा दैनंदिन अभ्यासाबाबत शिक्षकांशी नेहमी चर्चा करतात अशा पालकांची दखल घेतली जाणार आहे. त्यांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गोविंद शेर्लेकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी मानले.

You cannot copy content of this page