न्हावेली-मेस्त्रीवाडी येथील प्रकार;जीविताला धोका असताना वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष
⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: तालुक्यातील न्हावेली मेस्त्रीवाडी येथे अकरा केव्हीची विद्युतभारीत लाईन गेले कित्येक दिवस जांभळीच्या झाडाला लागलेल्या अवस्थेत आहे, ग्रामस्थांनी याची वेळोवेळी जाणीव करून देखील याकडे मात्र वायरमन पर्यायाने वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे संबंधित प्रकारावरून दिसत आहे. गावा गावातील वाढीव वीज बिलांचा प्रश्न तर सुटता सुटत नाहीत, अशातच आता विद्युतभारीत लाईन अशा धोकादायक स्थितीत असल्यामुळे येथील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जून महिन्याlपासून पावसाळा सुरू झाला असून अशा परिस्थितीत अशा धोकादायक स्थितीमुळे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाळा सुरु होण्याअगोदर वीज वितरण विभागाने वीज समस्यांबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. यात गंजलेले किंवा जीर्ण झालेले विद्युतभारीत धोकादायक पोल बदलणे, विद्युतभारीत लाईनवरील वाढलेली लहान तसेच मोठी झाडी तोडणे आवश्यक आहे. मात्र न्हावेली-मेस्त्रीवाडी येथील या प्रकारावरून असे दिसून वीज वितरण विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. मेस्त्रीवाडी येथे अकरा केव्ही विद्युतभारीत लाईन ही झाडाला जांभळीच्या लागलेल्या अवस्थेत आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी याची वेळोवेळी वायरमन यांना जाणीव करून दिली, मात्र संबंधित वायरमन व प्रशासन याकडे जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. ही वायर झाडाला लागून असल्याने कोणाच्या जीवितला धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी वीज वितरण जबाबदार राहणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
