शेकडो भाविकांनी कोंबड्या बकऱ्यांचा नवस फेडत नवस बोललेही.
⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या बैरागी कासारटाका येथे आज नवस फेडण्यासाठी आणि बोलण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने कासारटाका भाविकांनी फुलून गेला होता . बैरागी कासारटाक्याला कोंबडी आणि बकऱ्याचा नवस बोलला आणि फेडला जातो.श्रावण महिना सुरू होण्या अगोदर ह नवस फेडले जात असल्याने आज भाविकांची मोठी गर्दी उसळल्याने कासारटाका येथे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.
या संबंधीचे अधिक वृत्त असे की, चौके पासून जवळच असलेल्या कासारटाका भागात बैरागी कासारटाका नावाचे देवस्थान असून पावसाळा सुरू झाल्यानंतर या देवस्थानला मालवण तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर भाविक येऊन कोंबड्या बकऱ्याचा नवस फेडतात व बोलतात. या देवस्थानच्या बाजूलाच ओढा असून पावसाळ्यात हा ओढा दुधडी भरून वाहत असतो. याच ओढ्याच्या काठावर तसेच कासारटाका परिसरात भाविक चिकन मटणाचे मांसाहारी जेवण बनवून ते कासारटाक्याला प्रसाद म्हणून दाखविल्यानंतर त्या जेवणाचा आस्वाद घेतला जातो. श्रावण महिना सुरू होण्या अगोदर कासारटाक्याचे नवस फेडले जातात.
श्रावण महिना सुरू होण्यास आता काही दिवसांचाच अवधी असल्याने त्यात आगामी श्रावण महिन्या पूर्वीच्या दिवसात दोन बुधवार व एक शुक्रवार असे तीनच दिवस नवस फेडण्यासाठी शिल्लक असल्याने आज रविवारचा मोक्का साधत कासारटाका येथे भाविकांनी गर्दी केली. कासारटाका भागात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्याने या भागात वाहतूक व्यवस्थेवर ताण पडला शिवाय काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.
