पाडलोस कालव्यावरील रस्त्यावर मोठाला खड्डा

प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहने रुतण्याचे अनेक प्रकार

बांदा ः प्रतिनिधी
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोसमध्ये दहा ते पंधरा फुट लांबीचा अपघाती खड्डा पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध वाहने रुतण्याचेही प्रकार घडले असून अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पाडलोस-मडुरा सीमाभागातील कालव्यावरील रस्त्यावर मे महिन्यात खडीकरण करण्यात आले. परंतु अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने कामाचा दर्जा उघड्यावर आणला. खडीकरण केलेल्या ठिकाणी सद्यस्थितीत चिखलाचे साम्राज्य असून गाड्या रुतण्याचे प्रकार सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचाच याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाला आहे. संपूर्ण मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक असताना केवळ काही ठिकाणी मलमपट्टी करण्यात आली. परंतु तेही काम पंधरा दिवसांत उखडले. अन् अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहनचालकांमधून बोलले जात आहे.
गणेश चतुर्थी सण अवघ्या सव्वा महिन्यावर येऊन ठेपल्याने निदान चतुर्थीपूर्वी तरी सदर पंधरा फुटी खड्ड्यावर तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.

You cannot copy content of this page