मालवण (प्रतिनिधी)
स्टॉक मार्केटमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून त्यातून उत्तम उत्पन्न मिळू शकते, त्यामध्ये धोका असली तरीही अभ्यास करून यामध्ये उत्तम करिअर करता येऊ शकते, परंतु स्टॉक मार्केट मध्ये करिअर करण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असते, असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रसाद नाडगौडा यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल, कॉमर्स असोसिएशन आणि इकॉनॉमिक्स विभाग यांनी संयुक्तरित्या स्टॉक मार्केट मधील करिअर संधी याविषयी मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या नरहरी झांट्ये सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रसाद नाडगौडा हे मार्गदर्शन करताना बोलत होते. श्री. नाडगौडा यांनी स्टॉक ब्रोकर, डीलर, फंडामेंटल अनालिस्ट, टेक्निकल अनालिस्ट इत्यादी करिअर संधीसाठी कोणकोणत्या परीक्षा द्याव्यात, कोणत्या सर्टिफिकेटची आवश्यकता असते, त्यासाठी कोणत्या आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागते, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक आवटी, डॉ. डी. व्ही. हारगिले, प्राध्यापक बी. एच. चौगुले, ग्रंथपाल संग्राम सिंह पवार, प्राचार्य डॉ. उज्वला सामंत, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक व परिचय तसेच सूत्रसंचालन केले. प्राचार्य उज्वला सामंत यांनी अतिथींचे स्वागत केले. करियर गायडन्स प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. संग्राम सिंह पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमांमध्ये कला व वाणिज्य विभागाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक सहभागी झाले होते.
