वराडकर हायस्कूलतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांना अनोखी ‘गुरुवंदना’

⚡मालवण ता.१६-: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा च्या वतीने गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करून प्रशालेतील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करून त्यांना अनोखी गुरुवंदना दिली. या सन्मानाने सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भारावून गेले.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे ईशस्तवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. संगीत साथ आर.ए. सावंत यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर ,उपाध्यक्ष आनंद वराडकर ,सचिव सुनील नाईक खजिनदार श्याम पावसकर ,स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर . उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती वासंती पंडितराव किणीकर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पद्मजा प्रमोद वझे, साबाजी गावडे, सुभाष वासुदेव म्हाडगूत, सामंत जयवंत बाबुराव ,माजी मुख्याध्यापक सर्जेराव पाटील, अनिल फणसेकर ,माजी मुख्याध्यापक मोहन लिंकर, पूर्णानंद नाडकर्णी,श्रीम. संध्या तांबे, प्रकाश कदम, वरिष्ठ लिपिक सुरेश कदम, माजी प्रयोगशाळा सहाय्यक तथा विद्यमान संस्था सचिव श्रीमती विजयश्री देसाई, माजी ग्रंथपाल तथा विद्यामन संचालिका स्वाती वराडकर, माजी शिपाई महादेव वाईरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतरांचा झालेला सन्मान हा इतर सन्मानापेक्षा अद्वितीय आहे, असे सांगत शुभेच्छा दिल्या. तर सर्व माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना एकाच व्यासपीठावर आणून शाळेच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न झाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी शिक्षकांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या. तर यावेळी माजी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रशालेचे नूतन मुख्याध्यापक संजय नाईक यांचा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा मुख्याध्यापक ऋषी नाईक सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आकर्षक भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडुरकर, समीर चांदरकर, सौ. विणा शिरोडकर यांनी केले आभार प्रदर्शन सौ. देवयानी गावडे यांनी केले. कार्यक्रमानंतर गुरु -शिष्य महिमेचे वर्णन करणारा दशावतार नाट्यप्रयोग सादर झाला.

You cannot copy content of this page