निवती पोलीस ठाण्यात नोंद
वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्रकिनाऱ्यावर खडकाळ भागात एक पुरुष जातीचा सुमारे 45 वयाचा बेवारस मृतदेह आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आढळला आहे. याबाबत निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आज सकाळी किनाऱ्यालगत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तिंच्या तो निदर्शनास आला.
त्यानंतर खवणे खोतवाडी येथील रहिवासी तथा म्हापण ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत यांनी या घटनेची माहिती निवती सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद वारंग यांना दिली. तत्काळ श्री. वारंग यांच्यासह पोलीस पाटकर, शेडगे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, रवी ठाकूर, बाळा मसुरकर हे सुध्दा किनाऱ्यावर माहिती मिळताच दाखल झाले.
त्यानंतर त्वरित घटनास्थळी रुग्णवाहिका बोलऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पाठविला आहे.
मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याने मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान मृतदेहाच्या नातेवाईकांचा तपास सह पोलीस निरीक्षक श्री. गोविंद वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली निवती पोलीस करीत आहेत. मृतदेहाच्या अंगावर निळ्या कलरची हाफ पँट आहे. कोणालाही मृतदेहाबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी निवती पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहपोलीस निरीक्षक गोविंद वारंग यांनी केले आहे.
