वनविभागाकडून जीवदान : दाभोली – वेंगुर्ले येथील घटना
⚡वेंगुर्ले ता.१८-: भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात धावताना कठडा नसलेल्या विहिरीत काल रात्री वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांच्या विहीरी मध्ये वन्यप्राणी बिबट्या पडला. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कडून बिबट्याला वाचविण्यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने फळी बांधून विहिरीत सोडली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पिंजरा च्या साहाय्याने सुखरूपपणे बाहेर काढले आहे. ही घटना आज 18 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
दाभोली भागात गेले काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या भागातील मांजरे कुत्रे त्याने आपले भक्ष केले आहेत. काल रात्री भक्ष्याच्या शोधात धावताना कठडा नसलेल्या आरोलकर यांच्या विहिरीमध्ये तो पडला. या बाबत वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल होत 20 ते 25 फूट खोल विहिरीतून त्या वन्यप्राणी बिबट्या यास सुखरूप बाहेर काढले.
तत्पूर्वी कठडा नसलेल्या या विहिरीत ग्रामस्थांनी विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने पाण्यात फळी सोडल्याने त्या फळीचा आधार घेत बिबट त्यावर बसून राहिला होता.
भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या या विहिरीत बिबट्या आत मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची 1 मध्ये समाविष्ट अन्नसाखळी मधील सर्वोच्च स्थानी असलेल्या वन्यप्राणी बिबट्याचा जीव वाचवता आला. त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
सदर वन्यप्राणी बिबट्या चा रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, वनपाल मठ हरी लाड, वनपाल नेरूर धुळु कोळेकर, वनरक्षक मठ सूर्यकांत सावंत, वनरक्षक तुळस विष्णू नरळे, वनरक्षक नेरूर सावळा कांबळे यांनी पोलीस पाटील जनार्धन पेडणेकर व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.
