⚡मालवण ता.०७-: मालवणात अतिउत्साही पर्यटकांचा उपद्रव कायम असून काही दिवसांपूर्वी दांडी येथील समुद्राच्या ओहोटीमुळे तयार होणाऱ्या पद्मगड कडे जाणाऱ्या धोकादायक समुद्र किनारी मार्गावर पर्यटकांनी गाड्या नेल्या असताना आज मंगळवारी सकाळी दांडी येथून याच वाळूच्या मार्गातून चारचाकी गाड्या घेऊन काही हौशी पर्यटक थेट पद्मगडावर पोहोचले. याठिकाणी त्यांची स्टंटबाजी सुरू असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी याठिकाणी जात संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आपण येथे आल्याचे अजब उत्तर या पर्यटकांनी दिल्याने पोलिसांसह सारेच चक्रावून गेले.
तारकर्ली समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात दोघा पर्यटकांना जीव गमवावा लागला. पावसाळी कालावधीमुळे जलपर्यटन बंद झाले असले तरी या घटनेमुळे पर्यटन व्यवसायास फटका बसला. मात्र दुसरीकडे येथे येणारे पर्यटकही स्वतः बेजबाबदार वागत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. दांडी येथून पद्मगडावर जाण्यासाठी तयार होणाऱ्या वाळू मार्गावरून थेट चारचाकी वाहने घेऊन पर्यटक पद्मगडावर जात असल्याचे प्रकार अलीकडे सातत्याने दिसून येत आहेत. मंगळवारी सकाळी देखील ५ ते ६ पर्यटकांच्या गाड्या पद्मगडावर गेल्याचे दिसून आले. याठिकाणी काहींकडून गाड्यांचे स्टंट सुरू होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक पोलीस गुरुप्रसाद परब यांनी पद्मगड गाठून या ठिकाणी आढळलेल्या पर्यटकांना खडेबोल सुनावले. यावेळी किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही येथे आल्याचे उत्तर त्यांनी दिले. या उत्तराने पोलीस देखील चक्रावून गेले. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, पर्यटकांनी अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून किनाऱ्यावर जाऊ नये, असे पर्यटक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिला आहे.
