⚡मालवण ता.०७-: चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर मंगळवारी सकाळी एक पुरुष जातीचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपासाअंती सदर मृतदेह महिनाभर बेपत्ता असलेले कुणकावळे टेंबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी (वय ६५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर या मार्गावरून जाणाऱ्या एका ग्रामस्थाला एक मृतदेह दिसून आला. या ग्रामस्थाने तात्काळ साळेल पोलीस पाटील रविंद्र गावडे यांना याबाबत माहिती दिली. पोलिस पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी करुन मालवण पोलीस ठाणे येथे घटनेची माहिती दिली. घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह पोलीस काँन्टेबल जानकर, वेगुर्लेंकर, येरम यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
या घटनेची माहिती जवळच्या कुणकावळे गावात मिळताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गेला महिनाभर बेपत्ता असलेले कुणकावळे टेंबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी (वय ६५) यांचा असल्याचा प्रथमदर्शी काही जाणकार ग्रामस्थांकडून सांगण्यात येत होते. मात्र मृतदेह पूर्णतः कुजलेल्या स्थितीत असल्याने मृतदेहाच्या जवळपास सापडेलेले कपडे तसेच मालवण पोलिसांनी केलेला तपास यानंतर सदरचा पुरुष जातीचा मृतदेह हा बेपत्ता जनार्दन घाडी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. जनार्दन घाडी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परीवार आहे.
