एकही हरकत नाही
मालवण (प्रतिनिधी) नगरपालिका प्रशासकीय पातळीवर निश्चित निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची अंतिम प्रसिद्धी उद्या दि. ७ जून रोजी होणार आहे. मालवण शहरातून प्रारूप प्रभाग आराखड्यावर एकही हरकत घेण्यात आलेली नव्हती, त्यामुळे मालवणातील इच्छुकांना प्रभाग रचना मान्य असल्याचे चित्र आहे. तरी अंतिम प्रभाग रचनेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मे २०२२ च्या आदेशास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाच्या १० मार्च रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानंतर १० मे रोजी त्या त्या नगरपालिका क्षेत्रातील प्रारूप प्रभाग आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर १४ मे पर्यंत हरकती सादर करायच्या होत्या. मालवणसह सावंतवाडी, वेंगुर्ला या तिन्ही नगरपालिकांतील प्रभाग रचनेच्या हरकतींवरील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
सोमवारी ६ जून रोजी विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने नगरपालिका पातळीवर सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेनंतर प्रभागांसाठी आरक्षण पडण्याची शक्यता आहे. मालवण शहरातून प्रारूप प्रभाग आराखड्यावर एकही हरकत घेण्यात आलेली नव्हती. तरीही राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नजरा अंतिम प्रभाग रचनेकडे लागून राहिल्या आहेत.
