मालवणात जलक्रीडा व साहसीक्रीडा व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
*⚡मालवण ता.२५-:* पर्यटन संचालनालया कडून होणाऱ्या पर्यटन व्यवसाय नोंदणीचा जलक्रीडा व साहसी क्रीडा व्यावसायिकांनी लाभ घेत आपल्या व्यवसायाची नोंदणी करून प्रारंभ प्रमाणपत्र घ्यावे. या नोंदणी मुळे अधिकृत पर्यटन व्यवसाय म्हणून शासन दरबारी नोंद होईल, असे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाचे कोकण विभाग उपअभियंता प्रशांत वाणी यांनी मालवण येथे बोलताना केले.
राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ व पर्यटन संचालनालय कोकण विभाग यांच्यावतीने मालवण येथील चिवला बीच हॉटेल मध्ये जलक्रीडा व साहसी क्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी उपअभियंता प्रशांत वाणी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपाध्यक्ष कमलेश चव्हाण, मालवण बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जल पर्यटन व्यावसायिक संघाचे जिल्हाध्यक्ष दामोदर तोडणकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत वाणी म्हणाले, कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणात व वारंवार येत असतात. मात्र शासनाने पर्यटन व्यवसायाकडे तेवढे लक्ष दिलेले नाही. आज पर्यटन, जल क्रीडा, साहसी क्रीडा या व्यवसायात किती जण कार्यरत आहेत, किती जणांचा या व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो याची माहिती शासनाकडे उपलब्ध नाही. म्हणूनच पर्यटन व्यवसाय नोंदणीचा उपक्रम राबविण्यात येत असून यातून पर्यटन व्यावसायिकांची अधिकृत नोंद शासनाकडे होईल. व्यावसायिकांनी स्वतःहून प्रतिसाद दिला तरच शासन व्यावसायिकांसाठी काही उपक्रम राबवू शकेल. व्यावसायिकांनी नोंदणी करून व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवून व्यवसाय सुरू करावा. नोंदणी केल्यानंतर पुढील परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास एक वर्षाची मुदत व्यावसायिकांना मिळणार आहे. त्यामुळे पर्यटनातील जास्तीत जास्त जलक्रीडा व साहसी क्रीडा व्यवसायिकांनी व्यवसाय नोंदणी करून घ्यावी असेही वाणी म्हणाले. नोंदणीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती यावेळी वाणी यांनी देत उपस्थित व्यावसायिकांच्या प्रश्नांचे निरसनही केले. १ फेब्रुवारीला मालवणात नोंदणी कॅम्प यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, जे जलक्रीडा व साहसी क्रीडा व्यावसायिक आज पर्यंत अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत किंवा ज्यांच्या व्यवसायाची नोंदणी झाली नाही अशा व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालया मार्फत व्यवसाय नोंदणी करून घ्यावी. मालवण सह जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील जास्तीत जास्त व्यावसायिकांची नोंदणी व्हावी यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील आहे. म्हणूनच दि. १ फेब्रुवारी रोजी मालवण येथील हॉटेल महाराज येथे जलक्रीडा व साहसी क्रीडा व्यवसाय नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. याचा मालवण तालुक्यातील व्यावसायिकांनी लाभ घ्यावा. अशाचप्रकारचे व्यवसाय नोंदणी कॅम्प वेंगुर्लाझ देवगड येथेही आयोजित करण्यात येतील, असेही मोंडकर म्हणाले. याच कॅम्प मध्ये व्यवसाय रजिस्ट्रेशन, फूड लायसन, हॉटेल मधील कामगार यांच्यासाठी ई- श्रम कार्ड नोंदणी देखील करण्यात येणार आहे असेही मोंडकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मुख्य पर्यटन स्थळांबरोबरच येथील ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे प्रकाशझोतात आणून तसेच येथील संस्कृती व परंपरा समोर आणून त्यातून पर्यटनाला आणखी चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या सहकार्यातून कोकण ट्रेक अँड ट्रेल्स या युट्युब चॅनलची निर्मिती करण्यात आल्याची माहिती यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग ऍडव्हेंचरचे कमलेश चव्हाण यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे या युट्युब चॅनलच्या माध्यमातून समोर आणली जाणार असून यातून पर्यटकांना माहिती मिळून पर्यटन वाढण्यास मदत होईल, असे यावेळी बाबा मोंडकर यांनी सांगितले. या कार्यशाळेस पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहर अध्यक्ष मंगेश जावकर, महिला आघाडीच्या सौ. अन्वेषा आचरेकर, जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शेखर गाड, किशोर दाभोलकर, रविकिरण तोरसकर, संजय केळुसकर, मनोज खोबरेकर, समीक्षा खोबरेकर आदी व इतर व्यावसायिक उपस्थित होते.
