सिंधुदुर्गनगरी ता २५ जिल्हा नियोजन समितीच्या नियमबाह्य व मनमानी कारभाराविरोधात २ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी जिल्हा प्रशासनास दिला आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन जिल्हा नियोजन समितीच्या नियमबाह्य कारभाराबाबत त्यांचे लक्ष वेधले आहेत.
तर २ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. नियोजन समिती सदस्य रणजीत देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीचे कामकाज हे विहित प्रक्रिये प्रमाणे व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासकीय परिपत्रका प्रमाणे होत नसून याबाबत आपणास वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे. विशेष करून सन २०२१- २२ या आर्थिक वर्षातील अतिवृष्टी व पूरहानी अंतर्गत मंजूर कामाच्या याद्या व जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध विकास कामांच्या याद्या नियमबाह्य व मनमानीपणे तयार करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत वेळोवेळी लेखी निवेदने देऊन देखील आपण कोणतीही दखल घेतलेली नाही व कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही .केवळ सत्ताधारी व वरिष्ठ अधिकारी यांच्या दबावाला बळी पडून आपल्याकडून मनमानी व नियमबाह्य पद्धतीचे कामकाज चालू ठेवले आहे. याबाबत न्याय मागण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे. तर अतिवृष्टी व पुरहानी अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षातील चुकीच्या पद्धतीने केलेली कामांची निवड तातडीने थांबऊन शासन निर्णयानुसार जिल्हा नियोजन समिती सभेत मान्यता घेण्यात यावी., जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत विविध कामांच्या याद्या नियमानुसार जिल्हा नियोजन समिती समोर ठेवून कामाची निवड करण्यात यावी, जिल्हा परिषद विविध विभागांतर्गत प्राप्त निधी अखर्चित राहिल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार कोषागार कार्यालयात भरणा करण्यात आला आहे सदर परत मागविण्यात आलेला निधी जिल्हा परिषदेला तातडीने देण्यात यावा. आदी मागण्या या निवेदनातून रणजित देसाई यांनी केले आहेत.
