सत्ताधारी भाजप-सेनेत वादंग;तब्बल सहा तास झाले तरी सुरू होती सभा
ओरोस ता.२०-: मागील सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला जिल्हा वार्षिक योजनेचा २०२२-२३ चा आराखडा शिवसेना सदस्यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार करून नामंजूर करून आणल्याने आज सभेत सत्ताधारी भाजपने वेगळीच खेळी केली. सभागृहात सादर झालेल्या आराखड्यातील मोजकी कामे वाचन करीत याच आराखड्याला मंजुरी देण्याचा ठराव गटनेते रणजित देसाई मांडला. याला विरोधी शिवसेनेने जोरदार विरोध केल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. अध्यक्षा संजना सावंत यांनी रणजित देसाई यांनी सांगितल्या प्रमाणे वार्षिक योजनेच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यासाठी ठराव मतदानास घेण्याचे आदेश दिल्याने बहुमताने आराखडे मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
यानंतर सेनेने सुद्धा आपल्या कामांचे वाचन सुरू केले. रात्री साडे आठ वाजेपर्यंत ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्ता यादीचे वाचन सुरू होते. त्यानंतर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार होती. जिल्हा परिषदेची तिमाही सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव यांच्यासह सत्ताधारी गटनेते रणजित देसाई, संतोष साटविलकर, सरोज परब रवींद्र जठार शिवसेना गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, प्रदीप नारकर, संजय आंग्रे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रा एन डी पाटील, अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक, अध्यक्ष-उपाध्यक्ष व नगरसेवक यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
