सिंधुदुर्गनगरी ता २० जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या सन २०२२-२३ च्या २ कोटी १९ लाख ७ हजार ५०० रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीस आजच्या पशुसंवर्धन समिती सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. या सभेला जिल्हा पशु संवर्धन समिती सचिव तथा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, समिती सदस्य मनस्वी घारे, देवगड सभापती रवी पाळेकर, स्वरूपा विखाळे, रोहिणी गावडे, अनुप्रिती खोचरे, मनोज रावराणे आदीसह तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभेत पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा परिषद स्वतःच्या उत्पन्नांचे सन २०२१-२२ चे १ कोटी ५५ लाख ६ हजार १०० रुपयाच्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यामध्ये विविध १६ योजनांसाठी अंतिम सुधारित तरतूद करण्यात आली. या सुधारित तरतुदीस आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली तर पशुसंवर्धन विभागाच्या सन २०२२-२३ साठीच्या मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २ कोटी १९ लाख ७ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीस आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पशु प्रथमोपचार केंद्राची दुरुस्ती २० लाख, साथीचे रोग अत्यावश्यक औषध खरेदी १५ लाख, पशुपक्षी प्रदर्शन व प्रचार ३५ लाख, खोडा पुरविणे २ लाख, शेळी गट वाटप १६ लाख, पशुवैद्यकीय दवाखान्यांना हत्यारे, उपकरणे, फर्निचर पुरविणे ५ लाख, पशुवैद्यकीय दवाखान्यांना क्षारमिश्रण जीवनसत्त्व व आवश्यक औषध पुरविणे २० लाख, अनुदानावर दुधाळ जनावरांना पुरवठा ५० लाख, पशुवैद्यकीय संस्थांचे बळकटीकरण ५ लाख, फॅट टेस्टिंग मशीनचा पुरवठा करणे २ लाख, कडबाकुट्टी मशीनचा पुरवठा करणे ४ लाख, महिला सबलीकरणासाठी ९० टक्के अनुदानावर सुधारित जातीची एकदिवसीय ५० कुक्कुट पिलांचा गट व पशुखाद्याचा पुरवठा करणे ९ लाख, अंड्यावरील कुक्कुटपालन व्यवसाय चालना देण्यासाठी अर्थसहाय्य ३ लाख, महिला सबलीकरणासाठी ७५ टक्के अनुदानावर शेळी गट ५ शेळ्या व १ बोकड पुरविणे १६ लाख, मृत गाय, बैल, म्हैस इत्यादी जनावरांची खोल खड्ड्यात पुरून विल्हेवाट लावणे ७ हजार ५००, सुधारित पैदासीच्या कोंबड्यांचे वितरण १७ लाख अशी तरतूद २०२२-२३ च्या मूळ अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याची माहिती सभेत देण्यात आली. मुबलक औषधांचा पुरवठा –
जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी आवश्यक त्या औषधांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोठेही साथरोग नाही. मात्र सर्व संबंधितांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांनी दिली.
