अचानक दाखल झाल्याने पदाधिकारी-अधिकाऱ्यांची उडाली धांदल
सिंधुदुर्गनगरी ता १३ जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा परिषदेला अचानक भेट देत खातेप्रमुख आणि पदाधिकारी यांच्या कडून कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा परिषदेला सकाळी ११ वाजता अचानक सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अचानक भेटीमुळे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली .या सदिच्छा भेटीत नारायण राणे यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि खाते प्रमुखांकडून जि प कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या दालनात जिल्हा परिषद अधिकारी खातेप्रमुख, पदाधिकारी यांची विचारपूस करून जिल्हा परिषद मार्फत सुरू असलेल्या विविध योजना, विकास कामे आणि झालेल्या निधी खर्चाबाबत आढावा घेत मार्गदर्शन केले. निधी खर्चाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.
