पर्ससीन मच्छीमारांचा साखळी उपोषणाला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट…

योग्य तो तोडगा काढण्यासाठी करणार प्रयत्न; अमित सामंतानी केली भूमिका स्पष्ट

मालवण (प्रतिनिधी) नव्या सुधारित मच्छीमारी कायद्यातील जाचक अटींविरोधात मालवणात पर्ससीन मच्छीमारांनी छेडलेल्या साखळी उपोषणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट देत प्रश्न जाणून घेतले. पर्ससीन मच्छीमारांच्या मागण्यांवर समन्वयातून तोडगा निघाला पाहिजे, यासाठी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा लवकरच सिंधुदुर्ग दौरा आयोजित केला जाईल. योग्य तो तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करेल, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यावेळी स्पष्ट केली.

सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने नवीन सुधारित मच्छिमार कायद्यातील जाचक अटीं विरोधात मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर सिंधुदुर्ग पर्ससीन धारक मच्छिमारांनी १ जानेवारी पासून साखळी उपोषण छेडले आहे. आज बाराव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. या उपोषणकर्त्या मच्छीमारांची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज भेट घेऊन भूमिका जाणून घेतली.

यावेळी तालुकाध्यक्ष विश्वास साठे, बाळ कन्याळकर, आगोस्तीन डिसोझा, सदानंद मालंडकर, बाबू डायस, प्रमोद कंडरकर, नाजीर शेख, सदफ खटखटे, सकिना खान आदी उपस्थित होते. यावेळी पर्ससीन मच्छीमार अशोक सारंग, कृष्णानाथ तांडेल यांनी अमित सामंत यांच्या समोर पर्ससीन मच्छीमारांची भूमिका स्पष्ट केली. मच्छीमारीतील आधुनिकता शासनाने स्वीकारली पाहिजे, आधुनिक पर्ससीन आम्ही मच्छीमारांनी नाही स्वीकारले तर मच्छीमारीतील आणखी चांगला कोणता व्यवसाय असेल तर तो शासनाने आम्हाला द्यावा, राज्याला मोठी समुद्र किनारपट्टी लाभली असताना मच्छीमारीला राज्यशासन चालना देणार नसेल तर उपयोग काय ? असा सवाल यावेळी अशोक सारंग यांनी उपस्थित केला.

यावेळी अमित सामंत म्हणाले, नवीन कायद्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत. परप्रांतीय ट्रॉलर्सचे अतिक्रमण हा गंभीर मुद्दा आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानेही योग्य ती कारवाई केलेली नाही. याचा फटका पर्ससीन मच्छीमाराना बसत आहे. पर्ससीन मच्छीमारी वरही अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. पर्ससीन व पारंपारिक या वादात आम्हाला पडायचे नाही. दोन्ही मच्छीमारांची बाजू जाणून घेऊन समन्वयातून तोडगा काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारचा असेल. पर्ससीन मच्छीमारांना शासनापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

यासाठी मुंबई येथे पर्ससीन व पारंपारिक मच्छीमार यांची शासनासमवेत बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करू. तसेच पर्ससीन मच्छीमारांचे प्रश्न प्रत्यक्षपणे जाणून घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा जिल्ह्यात दौरा आयोजित करू, असेही सामंत म्हणाले.

You cannot copy content of this page