मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची मेरिटाईम बोर्डाकडे मागणी
*⚡कुडाळ ता.१२– :कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील पॅरासिलींग, नौका विहार यासह विविध वॉटर स्पोर्ट्सच्या परवान्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका संबंधित संस्था व व्यावसायिकांना बसला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन या व्यवसायासंबंधीच्या परवानग्या त्वरित मिळाव्यात, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडे केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला असून जिल्ह्यामध्ये देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. जिल्ह्यातील मालवण किल्ल्यासह इतर समुद्र किनारे, खाडी क्षेत्र यामध्ये प्रामुख्याने पॅरासिलींग, नौका विहार आदी जलक्रीडासाठी (वॉटर स्पोर्ट्स) विविध ठिकाणाहून पर्यटक सिंधुदुर्गात येत आहेत. या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अनेक युवक एकत्रित येवून संस्थेच्या माध्यमातून आणि वैयक्तिक स्वरूपात अशा व्यवसायामधून पुढे येत आहेत. या व्यवसायातून ते स्वावलंबी होत आहेत. अनेक कुटुंबांना रोजीरोटी प्राप्त होत आहे. पण मागील कोरोना काळापासून मेरिटाईमकडून या व्यवसायांच्या परवानग्या बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका नवीन व्यावसायिक व नूतनीकरण करणाऱ्या संस्थाना बसला आहे. या व्यवसायातील युवकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे हे युवक नाईलाजाने परवान्याशिवाय व्यवसाय करण्यास प्रवृत्त होत असून, कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन किल्ला वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यवसाय, खाडीतील प्रवासी वाहतूक, पॅरासिलींग, नौका विहार आदी जलक्रीडा व्यवसायसंबंधीच्या परवानग्या त्वरित मिळाव्यात, अशी मागणी परब यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी गणेश कदम व मेरिटाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सैनी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच परवानग्या देणार असल्याचे सैनी यांनी सांगितले आहे, अशी माहिती मनसेच्यावतीने देण्यात आली.
