दीपक केसरकर यांची ग्वाही;सातेरी-केळबाय-रवळनाथ मंदिर पुनःप्रतिष्ठापना दिन उत्साहात
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. श्री देवी सातेरी केळबाय रवळनाथ मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देईन, असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी दिले.
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली-देऊळवाडी येथील श्री देवी सातेरी-केळबाय-रवळनाथ मंदिराच्या पुनः प्रतिष्ठापना दिनानिमित्त सम्राट क्लब केरी-सत्तरी (गोवा) यांच्या “स्वर सांज” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार केसरकर यांनी भेट दिली. यावेळी केसरकर यांनी उपस्थित कलाकारांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर शिवसेना दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. मोहन गावकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री सातू गोपाळ गवस व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, “स्वर सांज ” कार्यक्रमात गायक रुपेश गावस, गुरूदास गांवकर, दत्तू गावस आणि साथी कलाकारांनी विविध गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे निवेदन संजय गांवकर यांनी केले. सूत्रसंचालन देवस्थान कमिटी सचिव नारायण गवस, विठ्ठल गवस यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत गोपाळ भिवा गवस, दिलीप गवस, संतोष गवस, सुभाष गवस, प्रवीण सावंत यांनी केले
