बांदा शहरातील रस्ते जलमय

निमजगा रस्ता तब्बल तीन फूट पाण्याखाली : बांदा-दाणोली वाहतूक बंद

*💫बांदा दि.१४-:* आज दिवसभर बांदा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई न केल्याने पहिल्याच पावसात शहरातील सर्व गटारे तुंबून शहरातील रस्ते जलमय झालेत. बांदा-निमजगा रस्ता तब्बल तीन फूट पाण्याखाली गेल्याने बांदा-दाणोली वाहतूक बंद होती. याठिकाणी असलेल्या लमाणी वस्तीत पाणी शिरल्याने एकच हाहाकार उडाला. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. यामुळे आज आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरिकांची व भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील निमजगा, जुनी नाबर शाळा, यासह ठिकठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत होती. निमजगा रस्ता तब्बल तीन फूट पाण्याखाली गेल्याने या रस्त्यालगत असलेल्या दुकानात पावसाचे पाणी शिरले. येथील लमाणी वस्तीत तब्बल कमरेपर्यंत पाणी साठल्याने कामगारांचे झोपड्यातील सामान वाहून गेले. बांदा-दोडामार्ग रस्ता गडगेवाडी येथे पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. याठिकाणी दोन्ही बाजूच्या गटाराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यातच जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यालगत खोदाई करण्यात आल्याने या मार्गावर पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

You cannot copy content of this page