जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचे निर्देश;व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आवाहन
*💫मालवण दि.११-:* मालवण शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून मालवण शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायीक, भाजी विक्रेते, मच्छीविक्रेते, स्टॉलधारक, संकुलातील दुकानदार या सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे बंधनकारक असून संबंधित सर्वांनी चाचणी करून घ्यावी, अशी सूचना मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
मालवण नगरपरिषदेने बाजारपेठ येथे बॉम्बे टेक्सटाईल दुकानाजवळ आरटीपीसीआर तपासणी पथक नियुक्त केले आहे. तसेच नगरपरिषद कार्यालय नजीक अल्प बचत हॉल, मालवण नगरपरिषद येथील कोव्हीड-१९ लॅब येथे तपासणी केंद्रामध्ये सकाळी १०.०० ते १२.०० व दुपारी ३.०० ते ५.००. या कालावधीत मालवण शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायीक, भाजी विक्रेते, मच्छीविक्रेते, स्टॉलधारक, संकुलातील दुकानदार या सर्वांनी आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी. तसेच कोव्हीड-१९ चा प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जे व्यवसायिक दि.१५/०६/२०२१ अखेर पर्यत आरटीपीसीआर तपासणी करुन अहवाल प्राप्त करुन न घेतल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना, दुकान शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात येईल असेही मुख्याधिकारी तथा इन्सीडंट कमांडर संतोष जिरगे यांनी म्हटले आहे.
