महिला शेतकऱ्यांना मिळाले शेतीसाठी अत्यावश्यक साहित्य..
⚡कुडाळ ता.२१-: समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीचा सुंदर संगम साधत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने चेंदवण येथील श्री पाताळेश्वर मंदिर परिसरात महिला शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय शेतकरी किट वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील २५ महिला शेतकरी भगिनींना शेतीसाठी अत्यावश्यक साहित्य असलेले किट वितरित करण्यात आले.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळने गतवर्षी चेंदवण येथे ६०० फळझाडांच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. त्या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा “पर्यावरणपूरक वाटचालीतून महिला सक्षमीकरण” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
वाटप करण्यात आलेल्या बहुउद्देशीय शेतकरी किटमध्ये दर्जेदार फळभाज्यांचे बियाणे, गांडूळ खत, खुरपी (शेतीचे अवजार) तसेच शेती कामादरम्यान त्वचेची काळजी घेण्यासाठी अँटी-फंगल क्रीम यांचा समावेश होता. या साहित्यामुळे महिला शेतकऱ्यांना आधुनिक, सुरक्षित व उत्पादनक्षम शेती करण्यासाठी निश्चितच हातभार लागणार आहे.
कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ. प्राप्ती तेली, सचिव सौ. प्राची तेरसे, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. सायली प्रभू, तसेच सौ. प्रिती तायशेट्ये, सौ. स्वप्नाली साळगावकर, सौ. ऋतुजा परब, सौ. आरोही माने, सौ. सई तेली, सौ. पल्लवी बोभाटे, श्रीमती वैशाली कुडाळकर, सौ. मेघा भोगटे, सौ. ममता पोरे, सौ. रश्मी नाईक यांच्यासह क्लबच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबी शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. लाभार्थी महिला शेतकऱ्यांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक समाधान व्यक्त करत अशा समाजोपयोगी उपक्रमांचे स्वागत केले.
“Grow & Flourish” या आंतरराष्ट्रीय इनरव्हीलच्या वर्षभराच्या संकल्पनेला साजेसा हा उपक्रम ठरला. पर्यावरणपूरक उपक्रमांमधून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विकासाची संधी पोहोचविण्याचा आणि महिला शेतकऱ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करण्याचा इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा हा आणखी एक स्तुत्य प्रयत्न ठरला.
