Headlines

विद्यार्थ्यांनी दिला रानभाज्यांमधून आरोग्याचा मंत्र

नेरूर माड्याचीवाडी विद्यालयाचा उपक्रम

कुडाळ : रानभाजीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता आहे. आपल्या आहारामध्ये रोज किमान एक तरी रानभाजी असावी. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आहारात रानभाज्यांचा जास्तीत-जास्त वापर करा, असे आवाहन रानभाजी अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांनी माड्याचीवाडी येथे केले.
एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी विद्यालयात रानभाजी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
कृषी अधिकारी पांडुरंग हडकर, श्री. मुख्याध्यापक अनंत सामंत, श्रीमती दाभोलकर, शिक्षक राजेंद्र घाडीगावकर, शामसुंदर राणे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. सामंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात उपलब्ध रानभाज्याचे प्रदर्शन मांडले होते. यामध्ये भांगरी, आडाळा, शेवगा,पेवगा, कुड्याच्या शेंगा, अळू, करटोल,अळंबी,एकपानी भाजी, घोट्याच्यावेली, केळ फुल, सुरण आदी रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या.विद्यार्थ्यांना नैसर्गिक भाज्यांचे महत्त्व कळावे.या नैसर्गिक भाज्या आपल्या आरोग्याला कश्या फायदेशीर आहेत याबद्दल मुख्याध्यापक श्री. सामंत यांनी माहिती दिली.
कृषी अधिकारी पांडुरंग हडकर यांनी माती परीक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली. प्रदर्शनाला माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे व माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष शिवराम गावडे यांनी भेट देऊन कौतुक केले.तसेच गावातील ग्रामस्थांनी प्रदर्शनाला भेट देऊन या शालेय उपक्रमाचे कौतुक केले.

You cannot copy content of this page