रवींद्र खेबूडकर:सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा भव्य सत्कार..
⚡कणकवली ता.२०-: विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून मोठी स्वप्ने पाहावीत. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी केले. युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २०२६ मधील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सोहळा रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांच्या हस्ते इस्रो सफरीसाठी तसेच गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना एकूण अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राथमिक विभागातून वि. मं. नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी, ता. वैभववाडी येथील पदवीधर शिक्षक पंढरीनाथ धोंडी सावंत यांना तर माध्यमिक विभागातून एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग येथील संतोष पांडुरंग सातार्डेकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावर्षीच्या STS-२०२६ परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता चौथी, सहावी आणि सातवीच्या ३० गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो सफरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच गोवा सायन्स सेंटरला भेट देण्याची संधीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश उर्फ गोटया सावंत, अध्यक्षा संजना संदेश सावंत, कुडाळचे गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, पंचायत समिती सदस्या राजश्री पवार, विजय भोगटे, संजय सावंत, सुनील घाडीगावकर, प्रफुल काणेकर, मयुरी मुंज, वैष्णवी सुतार, मीनल पवार, अंजली शिरसाट, संतोष जाधव, विद्याधर तांबे तसेच जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेचे हे दहावे वर्ष असून पुढील STS परीक्षा रविवार, १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेचे अर्ज वितरण सुरू झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातून परीक्षा होणार असून मुख्य परीक्षा केंद्र कणकवली कॉलेज, कणकवली येथे राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य २६ केंद्रांवरही परीक्षा होणार आहे.
परीक्षेची उत्तरपत्रिका OMR पद्धतीने संगणकाद्वारे तपासली जाणार असून निकालाच्या दिवशी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकालासह सोडवलेली उत्तरपत्रिका पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
