Headlines

‘दक्ष सावंतवाडीकर’च्या विविध नागरी प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांची भेट; तातडीने कार्यवाहीचे आश्वासन…

⚡सावंतवाडी ता.२०-: ‘दक्ष सावंतवाडीकर’ या नागरिकांच्या ग्रुपवर उपस्थित करण्यात आलेल्या विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने अॅड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी (सीओ) यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक यांनी दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेला सादर केलेल्या निवेदनावर अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली. या निवेदनामध्ये सावंतवाडी शहरातील बाजारपेठेतील पार्किंगची व्यवस्था, शहरातील वन-वे वाहतूक योजनेची अंमलबजावणी, अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच इतर नागरी प्रश्नांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे अॅड. समीर वंजारी यांनी उभा बाजार येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. योगा सेंटरच्या बांधकामामुळे पाईपलाईनची झालेली तूटफूट, त्यामुळे वाढलेली पाणीटंचाई तसेच काही नागरिकांकडून थेट पाईपलाईनला पंप जोडले जात असल्याचा प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
याशिवाय अलीकडेच झालेल्या गटार बांधकामांमध्ये वीज व दूरध्वनीचे खांब जागेवरच ठेवून काम पूर्ण करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित कामांच्या गुणवत्तेची पाहणी करण्याचीही मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी सध्या सुरू असलेल्या एसआयआर (SIR) कार्यक्रमाबाबत बीएलओ (BLO) यांनी राजकीय पक्षांच्या कार्यालयात बसून नागरिकांना फॉर्मसाठी बोलावण्याऐवजी घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्याच्या सूचनांचे पालन व्हावे, अशी मागणी केली.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागप्रमुखांना उपस्थितीतच सूचना देत सर्व प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच ‘दक्ष सावंतवाडीकर’ ग्रुपने नागरिकांच्या समस्यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अॅड. संकेत नेवगी, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, तालुका सचिव सतीश आकेरकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page