सोनम वांगचुंग यांच्या समर्थनार्थ युवा सेनेचे आंदोलन :केंद्राच्या दडपशाहीचा युवा सेनेकडून निषेध..
⚡कुडाळ ता.२०-: ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जगप्रसिद्ध शिक्षण तज्ञ पद्मश्री सोनम वांगचुंग यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने आज कुडाळ मध्ये ‘स्वाक्षरी मोहीम’ राबवण्यात आली. या अभियानाला नागरिकांसह तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या दडपशाहीचा यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी निषेध केला.
देशातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या ‘पेपर फुटी’च्या गंभीर प्रकरणांविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनाम वांगचुंग आणि अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी येथील कुडाळ हायस्कूलसमोर ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या विशेष स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अनेक विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी सही करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले, गेले अनेक दिवस दिल्लीत जंतरमंतर येथे सुरु असलेले सोनम वांगचुंग आणि अभिजित दिपके यांचे जे आंदोलन सुरु आहे ते दडपणायचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. त्याचा निषेध करून सोनम वांगचुंग आणि अभिजित दिपके याना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. अवघ्या दहा मिनिटात शेकडो सह्या या फलकावर विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. याचाच अर्थ विद्यार्थ्यांच्या मनात आक्रोश आहे. ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न येईल त्या त्या वेळी युवा सेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील असे मंदार शिरसाट म्हणाले.
विनय पालकर या विद्यार्थ्याने सुद्धा विद्यार्थ्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. दिवस रात्र विद्यार्थी मेहनत करून अभ्यास करून नीट सारख्या परीक्षा देतो. पण त्या परीक्षांचे पेपर फुटुतात, निकालात घोळ होतात हि गोष्ट विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य खच्ची करणारी आहे. हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळतंय. या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यासाठी हि राबविलेली हि मोहीम योग्य असल्याचे विनय पालकर याने सांगितले.
यावेळी युवा सेने जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसेचे जिल्हाप्रमुख धीरज परब, काँग्रेसचे अभय शिरसाट, विजय प्रभू, ठाकरेसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी आणि ममता राऊळ यांनी सुद्धा उपस्थित राहून या मोहिमेला पाठिंबा दिला. यावेळी जयभरात पालव, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, मंजुनाथ फडके, संजय बोभाटे, विनय पालकर यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
