आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण..
⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, तालुका प्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, संदेश नाईक, नेरूर सरपंच सौ. घाडी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अशा विकासकामांची आवश्यकता असून भविष्यातही जनतेच्या हितासाठी विविध विकास प्रकल्प राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या श्री कलेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
