कणकवलीत पुलाखाली आढळलेल्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

⚡कणकवली ता.१३-: शहरातील पेडणेकर ज्वेलर्स परिसरातील पुलाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम अंकुश जाधव (वय ३२, रा. ऑफिस महाडिक कॉम्प्लेक्स, कणकवली) हे १० मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वा. च्या सुमारास पायी बाजारपेठेकडे जात असताना पेडणेकर ज्वेलर्स येथील पुलाखाली एक पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ कणकवली पोलिसांना याची माहिती दिली.

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. सापडलेल्या मृत इसमाचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून उंची सुमारे ५ फूट ५ इंच आहे. अंगाने सडपातळ असलेल्या या व्यक्तीच्या डोक्यावर काळे – पांढरे विरळ केस असून वर्ण सावळा आहे. मृताच्या अंगावर निळ्या रंगाचा बरमोडा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे नातेवाईक अथवा ओळखीची व्यक्ती असल्यास त्यांनी कणकवली पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page