ओरोस येथे औषधवाहू आयशर टेम्पो पलटी…

चालक किरकोळ जखमी, वाहतूक काही काळ ठप्प.

⚡ओरोस ता १२-: मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील भवानी सुपरमार्केटजवळ मंगळवारी सायंकाळी औषधांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, अपघातात वाहनाचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ सर्व्हिस रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
एमएच ४८ एजी ७२४९ क्रमांकाचा आयशर टेम्पो मुंबई-गोवा महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने जात होता. ओरोस-सावंतवाडी मार्गावरील भवानी सुपरमार्केट परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर टेम्पोने महामार्गावरील संरक्षक कठडा आणि लाईट पोलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो सर्व्हिस रोडवर जाऊन पलटी झाला.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील संरक्षक कठडा व लाईट पोलही तुटल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टेम्पो रस्त्यावर आडवा पलटी झाल्याने सर्व्हिस रोड काही काळासाठी बंद झाला होता. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस तसेच सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करत अपघाताची माहिती घेतली.

अपघातप्रवण ठरत आहे येथील परिसर
मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील सावंतवाडा परिसरातील महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, आज झालेल्या टेम्पो अपघातामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनांचा वाढता वेग, वळणाचा भाग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे या परिसरात अपघातांची संख्या वाढत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर, अतिरिक्त संरक्षक कठडे तसेच इशारा दिवे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

फोटो ओळ:- ओरोस :-

You cannot copy content of this page