“महिला संरक्षणासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ‘स्त्री रक्षण ब्रिगेड’ उभी करावी”…

आमदार प्रमोद जठार: विशाल परब यांनी केले प्रमोद जठार यांच जंगी स्वागत..

⚡सावंतवाडी ता.०७-: महिलांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची असली तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली वेगळी ब्रिगेड उभी करावी, स्त्री रक्षणासाठी ब्रिगेड म्हणून काम करावं असे आवाहन नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी केले. तसेच प्रमोद जठारच मन विशाल आहे. शतप्रतिशत भाजप करण्यासाठी मन विशाल ठेवून एकदिलाने काम करा असे आवाहनही त्यांनी केले. येथील भाजप जनसंपर्क कार्यालयास त्यांनी भेट दिली. यावेळी युवा नेते विशाल परब यांच्याकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या सोबत भाजपचे युवा कार्यकर्ते ताकदीने काम करतील असा विश्वास व्यक्त करत कोकणसासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी श्री. परब यांनी केली.

दरम्यान, आम. जठार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भाजप हा एक विचार आहे. साडे तीन हजार वर्षांचा विचार जपणारा हा पक्ष असून राष्ट्र टिकवण्यासाठी आपला लढा आहे. समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार अटल बिहारी वाजपेयी यांचा असून भाजपचा कार्यकर्ता राष्ट्र, संस्कृतीचा विचार करणारा आहे. सत्तेचा वापर अंत्योदयासाठी झाला पाहिजे, गरीब माणसापर्यंत पोहचून पक्षाचा मूळ विचार जपायचा आहे असे मत व्यक्त केले. तसेच सावंतवाडीत भाजपची दोन नाही तर घराघरात कार्यालय झाली पाहिजेत. शतप्रतिशत हा आपला नारा असून आपल मन विशाल ठेवून काम करा. राणेंच्या भाजप प्रवेशावेळी आमच्यातील काहींनी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली होती.‌ मात्र, आपलं घर आपण का सोडावं ? अशी भूमिका घेत त्यांचेही पक्षात स्वागत केले. आज त्यामुळेच जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठी आहे. शतप्रतिशत भाजपसाठी सर्वांना एकत्र घेऊन चालण आवश्यक आहे. प्रत्येकजण इथे आला पाहिजे यासाठी एकसंघपणे कार्य करावं, असा कानमंत्रही त्यांनी दिला. तर राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे ब्रीद घेऊन कार्यरत राहा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, माजी नगरसेवक राजू बेग, पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी, रंगनाथ गवस, बाळा जाधव, केतन आजगावकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page