प्रमोद जठार: सावंतवाडीत पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत..
⚡सावंतवाडी ता.०७-: कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच आज मी पुन्हा एकदा आमदार होऊ शकलो असून त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तुमचे प्रेम आणि विश्वास माझ्यावर कायम राहू दे, असे भावनिक उद्गार नवनिर्वाचित विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी आज सावंतवाडीत काढले. यावेळी सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना जठार म्हणाले की, पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा सोपविलेली जबाबदारी मी निश्चितपणे सार्थ ठरवेन. मागील काळात राहिलेला विकासाचा बॅकलॉग पुढील सहा वर्षांत भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कोकणातील बेरोजगारीची समस्या गंभीर असून रोजगारनिर्मितीसाठीही विविध स्तरावर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे हे प्रभावीपणे काम करत असून त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आपण सर्वांचे ऋणी असल्याची भावना देखील जठार यांनी यावेळी व्यक्त केली.
