सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा…

दीपक केसरकरांचा पाठपुरावा:आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक…

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विषयक विविध प्रश्नांबाबत आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालयांतील समस्या, रिक्त पदे, महात्मा फुले आरोग्यदायी योजना तसेच आयुष व पंचकर्म केंद्रांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले, कुमार भोगले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी आदी उपस्थित होते.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला गती
सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणामुळे बांधकामास विलंब होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी युवराज लखमराजे भोसले व कुमार भोगले यांनी हॉस्पिटल उभारणीस कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करत आवश्यक नाहरकत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे मान्य केले. त्यामुळे हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळून सात वर्षांचा कालावधी झाल्याने नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रस्तावित हॉस्पिटललगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे दोन मजली विस्तारीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

रिक्त पदे महिनाभरात भरण्याचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळ रिक्त असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी तातडीने दखल घेत वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे येत्या महिनाभरात भरण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले.

महात्मा फुले योजनेअंतर्गत सुविधा पुन्हा सुरू होणार
महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत गोवा मेडिकल कॉलेज व के.एल.ई. हॉस्पिटल, बेळगाव येथे मिळणाऱ्या सुविधा सध्या बंद झाल्याने सिंधुदुर्गातील रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत मांडला. यावर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित योजना पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आरोग्य केंद्रांच्या इमारतींना मंजुरी
जिल्ह्यातील मंजूर व प्रस्तावित आरोग्य केंद्र व उपकेंद्र इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांना लवकर मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

रेडी, आंबोली व आचरा येथे पंचकर्म केंद्रांची मागणी
पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गात आयुष व वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पंचकर्म सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी केली. या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत आरोग्यमंत्र्यांनी प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्ह्यातील परिचारिकांच्या रिक्त पदांबाबतही चर्चा झाली असून त्यावरही लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत भेडसावणाऱ्या समस्या सोडवून आवश्यक कामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page