सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पहिल्या पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा शनिवार दिनांक ९ मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ख्रिस्तधर्मीय जगतातील अनेक उच्चपदस्थ कर्डीनल्स, बिशप, धर्मगुरु आणि मान्यवर उपस्थित राहणार असून, हा ऐतिहासिक क्षण ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार असल्याची माहिती सावंतवाडी कॅथेड्रलचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर मिलेट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सिंधुदुर्गचे नवनियुक्त बिशप अग्नेलो पिन्हेरो, विकर जनरल रेव्ह. फादर अँद्रू डिमेलो, सहाय्यक धर्मगुरू फादर अमृत, सल्लागार रेव्ह. फादर फेलिक्स लोबो, प्राचार्य रेव्ह. फादर रिचर्ड, माजी नगराध्यक्षा आना रोजीन लोबो, सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशनचे अध्यक्ष जॉय डान्टस,
ऑगस्तीन फर्नांडिस, जो रॉड्रिक्स, डुमिंग डिसोजा, ग्रेगरी डान्टस,
स्टिवन डिसिल्वा, रेमी आल्मेडा
डुमिंग आल्मेडा, लॉरेन्स डिसोजा, रॉबर्ट आल्मेडा आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, या सोहळ्याचे उद्घाटन मुंबईचे आर्चबिशप एमिरेट्स कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते संपन्न होईल, तर मुख्य मिसा अर्पण सोहळ्याचे अध्यक्षपद गोवा आणि दमणचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेराव भूषवणार आहेत. या प्रसंगी मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, पुण्याचे बिशप सायमन अल्मेडा, अमरावतीचे बिशप मॅल्कम सिक्वेरा, बेळगावचे बिशप डेरिक, गोव्याचे बिशप सिमाव, नाशिकचे बिशप लुर्ड्स आणि सिंधुदुर्गचे बिशप एमिरेट्स अल्विन बर्रेटो यांच्यासह सलेशियन, जेझुइट, कॅप्यूचिन आणि फ्रान्सालियन या धार्मिक संस्थांचे प्रांतीय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यानिमित्त शनिवारी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता नूतनीकरण केलेल्या कॅथेड्रलचा मुख्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा पार पडेल. दुपारी १२ ते २ या वेळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये धार्मिक मान्यवर, कॅथेड्रलचे आर्किटेक्ट ब्रायन सोरेस, इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर मिलिंद तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या भव्य वास्तूच्या उभारणीत सर्व समाजातील नागरिकांचा आणि भाविकांचा मोलाचा सहभाग लाभला असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सावंतवाडीतील पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा ९ मे रोजी भव्य उद्घाटन…!
