बांदा–नेतर्डे मार्गाची दयनीय अवस्था…

१७ मेपर्यंत काम सुरू न झाल्यास १९ ला ‘रस्ता रोको’चा इशारा..

⚡बांदा ता.०६-: बांदा–नेतर्डे महाखाजन मार्गावरील रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून मंजुरी मिळूनही दोन वर्षांपासून काम प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बांदा शहर विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत १७ मेपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास १९ मे रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात बांदा ग्रामपंचायत सदस्य तसेच ठाकरे शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा व्यापारी अजय महाजन, निखिल मयेकर, गणेश सावंत आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा ते नेतर्डे मार्गावरील रामनगर ते मिठगुळी दरम्यान सुमारे ५०० मीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळूनही दोन वर्षे उलटली, तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे १७ मेपर्यंत काम सुरू न झाल्यास १९ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बांदा शहर विकास आघाडीने दिला आहे.
फोटो:-
सावंतवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना साईप्रसाद काणेकर, मिलिंद सावंत, अजय महाजन व गणेश सावंत.

You cannot copy content of this page