संतोष नानचे यांच्या तत्परतेने मार्ग मोकळा..
⚡दोडामार्ग ता.०६-:
दोडामार्ग शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अचानक रस्त्यावर कोसळलेल्या फणसाच्या झाडामुळे नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. अंधाराच्या वेळेत ही घटना घडल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता आणि अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता.
या परिस्थितीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी तत्काळ पुढाकार घेत घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही यंत्रणा येण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतः हातात कुऱ्हाड घेत स्थानिक तरुणांच्या मदतीने झाड हटवण्याचे काम सुरू केले. अल्पावधीतच रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
या कामात ओंकार पेडणेकर, शिवम पांचाळ, लक्ष्मण परब, महेश रवार, फोंडू हडीकर आणि चिन्मय प्रसादी या तरुणांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा अपघात टळला आणि अडकलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळाला.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून संतोष नानचे आणि सहकार्य करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे. तसेच, अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनानेही तत्काळ प्रतिसाद देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही घटना जनतेसाठी तत्परतेने काम करणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श ठरत आहे.
